अमळनेर:-
तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव आज ता. 26 रोजी कृतिका नक्षत्र पासून सुरु होत आहे. कार्तिक स्वामीचे दर्शन आज दुपारी 2 वाजेपासुन तर सोमवारी 1 वाजून 35 मिनिटापर्यंत घेता येईल. या शुभ मुहूर्तावर दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. हा योग वर्षातून एकदाच येत असल्यामुळे लाखोच्या संख्येने दरवर्षी भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. हा यात्रोत्सव बोरी नदी काठावर भरविला जातो. या बोरी नदीवर पाण्याचा साठवण बंधारा बांधण्यात आल्याने यावरून पडणारे पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील कार्तिक स्वामींच्या तीन मंदिरापैकी अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील एक मंदिर आहे. या यात्रोत्सवाचे संपूर्ण खान्देशात महत्व असल्याने दोन दिवस लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. दरम्यान मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकानी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थांनाच्या वतीने करण्यात आले आहे.