अधिकाऱ्यांची मर्जी जिंकणाऱ्या पालिकेतील प्रस्थापित ठेकेदारांना ब्रेक द्या
राष्ट्रवादी युवक चे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांचा इशारा
अमळनेर-
येथील नगरपरिषदेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून विविध कामांचा ठेका घेणाऱ्या प्रस्थापित ठेकेदारांनी पालिकेला अक्षरशः लुटले असून काही अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ते झाल्याने त्यांनाच पुन्हा ठेका घेण्याचे मार्ग दाखविले जात आहेत मात्र अश्या लूट करणाऱ्या ठेकेदारांना ब्रेक न दिल्यास साऱ्यांचे पितळ उघडे करणार असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात भूषण भदाणे यांनी म्हटले आहे की अमळनेर नगरपरिषदेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज असून सर्व कामकाज अधिकारी वर्गाच्या नियंत्रणाखाली चालत आहेत,पालिकेत प्रत्येक विभागात काही साहित्याचा पुरवठा करणे असेल किंवा मजूर पुरविणे असेल आदी कामे टेंडर प्रोसेस द्वारे खाजगी ठेकेदारांना दिले जात असतात. मात्र घेतलेल्या माहितीनुसार असे निदर्शनास आले आहे की पालिकेत गेल्या आठ वर्षात काही दोन चार ठेकेदार प्रस्तापित झाले असून विविध कामांचे ठेके घेऊन अव्वाच्या सव्वा बिले त्यांनी काढत गडगंज झाले आहेत.म्हणजेच अधिकारी वर्गास हाताशी धरून जनतेचा पैसा लुटण्याचाच हा प्रकार आहे.यासंदर्भात विद्यमान आमदाराना देखील ही बाब निदर्शनास आणून दिली असून कोणत्याही परिस्थितीत या लुटारू ठेकेदारांना ब्रेक देण्याची आवश्यकता आहे.तरी कोणत्याही अधिकारी वर्गाने या लुटारूना प्रोत्साहन दिल्याचे निदर्शनास आल्यास आणि पुन्हा त्यांनाच ठेके दिल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भदाणे यांनी दिला आहे.